वेळ साधारण सकाळची ३:३० – ४ ची …किंवा ११:३० – १२ ची …किंवा रात्री ७:३० – ८ चि… मोबाईल कर्कश्य आवाजात किणकिणतो…. पलीकडून, “…, हा … ह्याल्लो … अवधूत सर…. पिकअप आहे?”… इकडून मी…”हा…आहे. किती वाजे पर्यंत कॅब येइ… ” …तो पर्यंत पलीकडच्या धसमुसळ्या ट्रान्सपोर्ट वाल्या कोर्डीनेटरने फोन ठेवलेला (आदळलेला) असतो… शिफ्ट सकाळची (मॉर्निंग) किंवा रात्री ची (नाईट) असेल आणि झोपमोड झाली असेल तर दोन अस्सल मराठमोळ्या शिव्या हासडायच्या आणि सो कॉल्ड ऑफिसला जाण्यासाठी आवर-आवरी करायची. आता तुम्ही अगदी घाईत असता आणि परत पुन्हा फोन वाजतो …”सर, कॅब तुमच्या घराखाली उभी आहे सर.… पाच मिनटात येता का सर… पुढचे पिकअप आहेत सर”…आता झक मारली आणि कॅब शेडूल बुक केलं असं वाटायला लागतं आणि हेच सगळं पुढच्याला लागू होतं.
आता माझ्यासारखा एखादा कॅब मध्ये झोपत नाही… आणि ड्रायवर दादांना न झोपणारा माणूस पुढच्या सीटवर लागतो किंवा आवडतो किंवा चालतो म्हणा हवा तर. तर असा मी आता पुढच्या सीट वर बसतानाच ड्रायवर दादांना नमस्कार-चमत्कार…गुड विष वगैरे म्हणतात ते करतो … आणि सोबत वयोमाना नुसार दादा, तात्या, नाना, काका वगैरे उपाधी पण हाणतो … एखादयाचा रुबाब बघून साहेब हि पटकन निघून जातं तोंडातून …समोरचा सावाळासा कॅब ड्रायवर पण खुश होतो. त्याला पण बरं वाटतं तोही जरा खुलतो. आता खरी गोम होते. त्याला एकतर असं वाटत असतं कि आता आपल्या बाजूला जो बसलाय तो ओफिसमध्ये कुणीतरी मोठ्या पदावर आहे किंवा हा जो आपल्या बाजूला बसलेला पोरगा आहे त्याला आज कॅब मध्ये येणाऱ्या सगळ्या मेम्बेरचे पत्ते माहिती आहेत. नेहमीचे येणारे, शिफ्ट मध्ये असणारे मेम्बर माहित असतात, त्यांचे पत्ते सांगून त्यांना घेऊन मी मोकळा होतो. नसतील माहित तर त्याला आधीच सांगतो, बाबारे पुढचे पिकअप कुणाचे आहेत ते आधी सांग… गाडी लेट नको व्हायला”. मग पुन्हा जरा कोर्डीनेटर शी संपर्क होतो आणि सगळे मेम्बर गाडीत उपस्थित होतात. लॉगशिट भरली जाते आणि बाकीचे मेम्बर कानात हेडफोन लावून गुडूप तरी होतात किंवा तिचं-त्याचं असा जे काही फोनवर चालतं ते गुलुगुलु चालू होतं.
आणि इथून मग आमच्या सारखा विना उद्योगी माणूस काय करणार? एक तर बाहेरची झाडं -पानं -फुलं ट्राफिक बाघणार, दिसलीच तर थोडी डोळ्यांसाठी हिरवळ शोधणार! पण मन बाहेर रमत नाही. मग हळूच आमचा मोर्चा आम्ही आमच्यावर खुश झालेल्या ड्रायवर दादांकडे वळवतो. “काय मग दादा आज पिकअप जरा ५-१० मिनिट लेट झाला नाही का?” (उगाच विषय काढायचा म्हणून काढायचा!)… त्यावर ड्रायवर दादा असं काही आपल्या बाजूला बघतात कि “तुझ्याआयला …आता हितं काय मी BMW चालवतोय का? का रेसिंग खेळतोय? का आता तुझ्यासाठी विमान उडवून आणू या ट्राफिक मधून?” असे त्यांच्या मनात प्रश्न चालू असल्या सारखं वाटतं. पण तरी (बहुदा) मनावर ताबा ठेवून (किंवा बहुतेक तोंडात तोबरा असल्यामुळे उचित वेळ घेऊन किंवा आता ह्यानेच आपल्याला एवढा मान दिलाय तर उलट कशाला बोला म्हणून) “त्याचा काये…. अमुक अमुक चौकात ट्राफिक जॅम झालती ना !” “असं का बरं”… “मं दादा, इथं कुठं राहता तुम्ही?” वगैरे संवाद चालू होतात. आणि मग अश्या थोडयाश्या दुर्लक्षिलेल्या किंबहुना हे आपल्यासाठीच राबवण्यात आलेले मजूर आहेत अशी हेटाळणी करण्यात आलेल्या ड्रायवर दादांशी माझा सुसंवाद साधला जातो. या मनीचे त्या मनी केले जाते…अनुभवले जाते.
जेव्हा पासून पुण्यात आलोय, म्हणजे साधारण ६ वर्षापासून असा अखंड संवाद चालू आहे या ना त्या कॅब ड्रायवरशी (उर्फ ड्रायवर दादांशी). जवळपास १०० च्या वर वेगवेगळ्या लोकांशी, वेगवेगळ्या वयाच्या, अनुभवाच्या लोकांशी, वेगवेगळ्या गुणाच्या स्वभावाच्या लोकांशी संवाद साधायला मिळतो. अनेक चांगले-वाईट , कडू-गोड अनुभव ऐकायला मिळतात. कित्येक तऱ्हेची हि माणसं – कॅब वाले.
हे एक नवीन सदर म्हणून तूमच्यापुढे मांडण्याचा मी आता प्रयत्न करणारे – उदयापासून. फक्त एक लक्षात ठेवायच कि यात मी नावं मात्र बदलली आहेत. त्यांच्या गोष्टी आणि अनुभव मात्र तेच अहेत.